डबडबुनी दो सुकण्ण डोळे भरून आले
मायाळू मन मानस भोळे भरून आले
मी शब्दांचा कीस पाडुनी अर्थ गाळला
कैक काफिये रदीफ गोळे भरून आले
कंप लहर की थरथर नवथर लवलव न्यारी
मुखचंद्रावर थबथब पोळे भरून आले
कलम निर्झरी काळी शाई टपोर अक्षर
चुरगळलेले कागद बोळे भरून आले
क्षितिजावरती समुद्र चाचे मौनी बाबा
सागर तीरी घन हिंदोळे भरून आले
अडिग राहण्या बूड भूवरी ठोकायाला
खिळे चुके हातोडे मोळे भरून आले
उघड सुनेत्रा खाकी खोकी निळ्या कटरने
अस्सल सोने अनंत तोळे भरून आले