दुपार झाली आला कोणी विकावयाला गारेगार
दुधी गुलाबी कुल्फी कांडी बनवुन चटपट चारे गार
सायकलीवर उन्हात फिरुनी थकून होता घामेघूम
गच्च ढगांची नभात दाटी सुटले अवचित वारे गार
गरगरणाऱ्या वावटळीवर मजेत पाचोळा उडतोय
ऊन बैसले झाडाखाली पक्ष्या गाणे गा रे गार
मेघ कशाला गडगड करती .. वीज कडाडत दळते काय
अता न असले प्रश्न तपविती भिजून झाले सारे गार
तडतड गारा थेम्ब टपोरे वळचणीस मन बसता मौन
वाळवलेल्या आठवणींचे पुन्हा जाहले भारे गार