घर कौलारू – GHAR KOULARU


ओठांमध्ये पालवलेले बोलायाचे आहे मजला
चित्रामध्ये आठवलेले रेखायाचे आहे मजला

चितारते मी सागर नयनी मिटते डोळे गाज ऐकुनी
डोळ्यामध्ये रंगवलेले वाचायाचे आहे मजला

रंग-गंध वेचून फुलांचे मधुसंचय मी करित राहिले
श्वासामध्ये साठवलेले प्राशायाचे आहे मजला

शेकोटीची उब जांभळी शब्द कापरे तप्त जाहले
काव्यामध्ये तापवलेले ओतायचे आहे मजला

तव झुळकीने मोहरलेल्या कळ्याफुलांचे मुग्ध रंग हे
हृदयामध्ये गोठवलेले शिम्पायाचे आहे मजला

अंगण हिरवे सडा फुलांचा घर कौलारू एक सुनेत्रा
गंधामध्ये सारवलेले बांधायाचे आहे मजला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.