भाव उसन्या भूमिकेचे लोचनी पाळू नको
कागदी जर वेदना तव कुंतली माळू नको
कवळ झंझावात जलदा गिरिमुखावर वर्षण्या
शब्द प्रक्षाळून घे पण भाव प्रक्षाळू नको
परसदारी फुलव कर्दळ केळ कोर्फड मोगरा
सांडपाण्यावर घराच्या गझल खंगाळू नको
गोवऱ्या वा शेणकूटे शब्द कुठलाही असो
शेण थापूनी करांनी घामबिम गाळू नको
मी “सुनेत्रा” सहज सुंदर गात मक्ता गुंफते
स्वप्न मम सत्यात आले बोलणे टाळू नको