मळलेल्या मम वाटेवरती मळता का हो
जुन्या पुराण्या जखमांतुन भळभळता का हो
शब्दांना तू पुद्गल म्हणुनी वापर मर्दा
पूस जनांसी शब्द ऐकुनी चळता का हो
बनी केतकी दाटुन येता गंध मृदेचा
नागवेलिच्या पानांवर सळसळता का हो
खोल डोह मन अथांग पाणी गडद काळिमा
झऱ्याप्रमाणे नीरावर खळखळता का हो
चमकायाचे नव्हते जर तर उगा फुका रे
रेषा रेघा रेखांनी घळघळता का हो
आवडतो जर निळा गारवा कृष्ण कपोती
तापतापुनी ग्रीष्मासम झळझळता का हो
आम्र मुनींना सवाल पुसते आज सुनेत्रा
हिमालयावर शिशिरामध्ये फळता का हो