नेत्रात धुंद प्रीत पण रिक्त रिक्त रात्र
अधरात मुग्ध गीत पण रिक्त रिक्त रात्र
नयनात सांजवात घन सावळे उरात
मल्हार आळवीत पण रिक्त रिक्त रात्र
आहे अता सुरात माझा-तुझा प्रवास
अंधार पाकळीत पण रिक्त रिक्त रात्र
काट्यास मी जपेन पुष्पास सांग तूच
रंगास पाखडीत पण रिक्त रिक्त रात्र
बघ वर्षतात मेघ अन नाचतात मोर
भिजते सखी सरीत पण रिक्त रिक्त रात्र
आला खुळा वळीव ओला मृदू सुगंध
भरतो जरी मनात पण रिक्त रिक्त रात्र
वृत्त- गा गा, ल गा ल, गा ल गा, गा ल गाल गाल.