पंकात वासनेच्या रुतले कधीच नाही
कमळातले अली पण डसले कधीच नाही
चढवून चिलखताला चिखलात खोल गेले
तेथे निवास करणे रुचले कधीच नाही
रंगून राजधानी सुकुमार भावनांची
व्यापार त्यात करुनी फसले कधीच नाही
घोटून अक्षरांना केली अशी करामत
ठिणग्या करात फुलल्या विझले कधीच नाही
तपवून पाप गेले देऊन पुण्य आले
भिजले कृतज्ञ भावे रुसले कधीच नाही
येता बहार सम्यक सद्धर्म पीक जगती
मिथ्यात्व अंतरी मम ठसले कधीच नाही
डोळे सुकण्ण चक्षू नयनात लोचनी हे
मज शोभती सुनेत्रा फुटले कधीच नाही