उठव स्वतःच्या सौन्दर्यावर ठसा स्वतःचा
उधळ स्वतःच्या सुंदरतेवर पसा स्वतःचा
कशास तुजला कुणी म्हणावे स्वतःस ओळख
स्वतःस कळता पूर्ण कहाणी वसा स्वतःचा
कोमल काया तरल मनाची अवघी माया
कटीवर सांडे कनक गुणांचा कसा स्वतःचा
ऐन्यामध्ये रंगरूप बघण्याच्या आधी
नित्य करावा साफसूफ आरसा स्वतःचा
कंठ गळा जणु शंख सुनेत्रा फूंक तयाला
श्वासातून मोकळा कराया घसा स्वतःचा