कोर चंद्राची कपाळी सिद्धशैली
भोर मायेची नव्हाळी सिद्धशैली
डोलते आहे गडावर जिंकुनी फड
माझिया कार्यास माळी सिद्धशैली
कुंदनासम चिद्घनातुन वळत जाते
देय दर्शन अंतराळी सिद्धशैली
अक्षरांतुन जाणवे मज लक्ष्य माझे
वेध घेण्या देय टाळी सिद्धशैली
लक्ष कोटी चांदण्यांचे बोल अधरी
अब्ज शब्दांतून क्षाळी सिद्धशैली
रातराणी कुजबुजे कानी कथेच्या
बघ फुलांची मांदियाळी सिद्धशैली
का बघू पंचांग आता कोणतेही
गोल फिरता बाण थाळी सिद्धशैली
मिथ्य सारे जाळण्या अंगार फुलतो
पूर्ण निवता राख गाळी सिद्धशैली
प्राशिण्या परिमल फुलांचा अष्टमूली
देतसे तबका झळाळी सिद्धशैली
काजळाने रेखलेली स्वाक्षरी मम
पीत पर्णे सहज ढाळी सिद्धशैली
जावळी खोरे कुणाला पेरणीला
जांभळ्या मातीत साळी सिद्धशैली
वाजवाया तीनतेरा का लिहू मी
सतत झरणारी पन्हाळी सिद्धशैली
जाणते गुणस्थान कितवे मोक्षदायी
पोत मम कंठात काळी सिद्धशैली
सिध्दशीळेवर “सुनेत्रा “अर्घ्य देण्या
मोतियांची रास भाळी सिद्धशैली