एक तुला मी दिला शिंपला सोन्याचा शिंपला
दवबिंदूंना झेलायाला सोन्याचा शिंपला
दोन शिंपले मिळून बनते हृदय आपुले जरी
उघड शिंपला अलगद वरचा हो पंखांची परी
दोन शिंपले दोन दलांसम घे तू पाठीवरी
होउन खग मग घेच भरारी निळ्या घनांच्यावरी
हृदयामधल्या दवबिंदूचे मोती उधळित जा
पडतील मोती जेथे जेथे अमृत शिंपित जा
येतील वरती मातीमधुनी मोत्यांची झाडे
झाडाखाली टपटपणारे वेचू कांचन तारे