समय आहे शांत आहे मुग्ध अंतर गात आहे
वारियातील मोगऱ्याच्या परिमलाने न्हात आहे
कुंदनाचे पात्र ग्रीष्मा वितळता भट्टीत तुझिया
मृत्तिकेचा गंध त्यातिल माझिया देहात आहे
मी कशी परजेन शस्त्रे मारण्या जीवास कुठल्या
जीव जगण्या लेखणीची परजते मी पात आहे
लाट येता पाणियातिल बिंब हलते फक्त माझे
तू नको पण डळमळू रे मी कुठे पाण्यात आहे
कोण मज हलवेल सांगा कविकुळातिल मी सुनेत्रा
भाग्य माझे थोर इतुके मी तुझ्या हृदयात आहे