अंतरीच्या वेदनेला लोचनी पाळू नको
मौन जर हे वेळकाढू कुंडली माळू नको
कवळ झंझावात जलदा गिरिमुखावर वर्षण्या
नेत्र प्रक्षाळून घे पण भाव प्रक्षाळू नको
परसदारी फुलव कर्दळ केळ अळु अन दोडका
सांडपाण्यावर घराच्या गाव खंगाळू नको
गोवऱ्या वा शेणकूटे शब्द कुठलाही असो
तीन धोंड्यांच्या चुलीवर घामबिम गाळू नको
सप्तमीला हालदारी मंदिरी जिनदेव हा
आसवांना तापवूनी भावना क्षाळू नको
तपव अश्रू गाळ अश्रू गाळ भर कनकामधे
सुकवुनी पण चाळणीने चारुता चाळू नको
मी सुनेत्रा सहज सुंदर गात मक्ता गुंफते
स्वप्न मम सत्यात आले बोलणे टाळू नको