शंका कशास कुठली निजभाव देव आहे
शुद्धोपयोग जपणे ना देवघेव आहे
पाऊल टाक पुढती रस्ता मिळेल सच्चा
आत्म्यावरीच श्रद्धा कसले न भेव आहे
चकली अनारशांचा दरवळ पिते रसोई
रंगीत हे चिरोटे दुरडीत शेव आहे
गाळून घाम जेव्हां होते कधी भुकेली
रसनेंद्रियांस सुखवे तो शब्द जेव आहे
जो तो जरी म्हणे मज ऐसीच तव तऱ्हा ही
येताच पुण्य उदया चढतोच चेव आहे
माझेच कर्म आहे त्याची फळे कशी पण
मजलाच खायची वा फुटणार पेव आहे
जगणार शांत भावे आहेच संयमी मी
जपली उरी सुनेत्रा दिलदार ठेव आहे