कीड नडली पुन्हा बहर नडले कुठे
पूर्ण उमलूनही पुष्प खुडले कुठे
लाल अंगांग झाले रगडले कुठे
चोर रंगेल हाती पकडले कुठे
हा उन्हाळा नव्हे पावसाळा नव्हे
नीर सांडे तरी भाव रडले कुठे
मत्स्य भरतीतले रास जाळ्यामधे
तप्त वाळूत मीन तडफडले कुठे
कर्म प्राचीन जर धर्म संयम हवा
कैक उपचार पण रोग झडले कुठे
वीज नाचूनही गच्च गगनातली
कृष्ण आषाढ मेघ गडगडले कुठे
हूड पाऊस माळेत अडकेल रे
मुक्त हस्तात हत्ती झगडले कुठे
माळ माळा नऊ तू नऊ रात दिन
हस्त नक्षत्र चित्रा उघडले कुठे
वीट भट्टीत सोने वितळण्या पुरे
घोस गगनी ढगांचे लगडले कुठे