मोरपिशी शालूवरी .. छल्ले चांद पंखी …..
पदरा निळे गोंडे गडद .. निळी वेलबुट्टी …..
काठ निऱ्यांचा ग घोळ .. पावलात लोळे …..
जास्वंदीचे पुष्प पर्ण.. चाफ्यासंग डोले…..
मोतिमाळ बोरमाळ .. तीन पदर सरी …..
कवडी माळ काळी पोत .. गळेसर लडी …..
चाफेकळी नाक भाळी .. हळदी कुंकू टिळा …..
अधर बंद पाकळ्यात .. मौन शब्द कळा …..
भृकुटीच्या मध्यातून .. सरळ रामबाण …..
सरताजी रत्न लाल .. जपा कुसुम वाण …..
नेत्र द्वय पाणिदार .. पीत कमल दले ……
दृष्टीतून तुझ्या सृष्टी .. वसंतात फुले …..
अंतरीची गुण खाण … किती किती खोदू ..
सुनेत्राच्या लेखणीने .. भाव शुध्द जोडू …..