धो धो हसण्या खळखळुनी जन निरोग निर्मल जोक हवा
सृष्टीचे गुणगान गावया स्वर सैराटी झोक हवा
अज्ञातातिल स्वर्ग सुखे या मनास नच रे लोभवती
इथल्या बांबू बनात फिरण्या हवा हवा इहलोक हवा
शौक भू वरी मम जीवाला ऊर्ध्व गतीचा जरी जडे
स्वतः स्वतः झरणारा निर्झर शोक मुक्त निर्धोक हवा
स्वरानुभूतीतिल तत्त्वार्थी चिंब भिजवुनी गाणाऱ्या
पाठीवर गाजत्या समुद्री घन लाटांचा ठोक हवा
अक्षर कळयुत सर्किट जोडुन आस नाचरा फिरवाया
गझलियतेतिल लोळ विजेचा सूत्रबंधनी श्लोक हवा
लोकाकाशी चार गतींचे चक्र भेदण्या कार्माणी
चिद्घन चपलेचा सळसळता सुनेत्रास आलोक हवा