झाले भावघन गोळा नाती सायीहून दाट
लोण्यासाठी विरजल्या राती सायीहून दाट
वावटळी चक्रीवात धूप कर्पूर गाभारी
झाले बीज अंकुरीत माती सायीहून दाट
बंध तोडायचे कसे जोडणारी मुळाक्षरे
ओततात नोटा नाणी पाती सायीहून दाट
धान्य सुपात ओताया पोती माय सोडते ही
झाले गळे ओठ मौन जाती सायीहून दाट
पंचभूते डोलताती ताल ठेका देह देतो
कंठातून मुक्त गीत गाती सायीहून दाट
सांज आरतीत तूप उजळले अंतर दीप
गाभाऱ्यात जिन मूर्ती वाती सायीहून दाट
लेकरांचे सुख सांडे आनंदाश्रू सुनेत्रात
माय मराठीचा धागा हाती सायीहून दाट