कशाला चौकशी आता तयांच्या कूट डावांची
खुशीने मौन मी घेते कळाली जीत भावाची
फुलांची गोष्ट मी लिहिता सुवासिक हात मम झाले
फळाली निश्चयाने नय कथा व्यवहार नावाची
घरांची अंगणे झाडून पोरी भिजविती माती
जुनी ओळख जपाया सुगंधाच्या स्वभावाची
जराही भ्यायले नव्हते तरीही गोठली गात्रे
मला होती कळाली गुप्त भाषा त्या ठरावाची
नदीकाठी पुराने घातला हैदोस तेंव्हाही
गरज ना भासली माझ्या किनाऱ्याला भरावाची
कळा मी सोसल्या होत्या खऱ्या रे बाळ जन्माच्या
कशाला बाळगू भीती जनांच्या क्षुद्र घावांची
धरा माझीच आहे पिंड पोसाया उभी सृष्टी
सुनेत्राला गरज नाही फुकटच्या तव जडावाची