उंची खोली कळली नाही
पण केंद्रातुन ढळली नाही
विद्वत्तेचा आब राखण्या
उथळपणे खळखळली नाही
बरे समजुनी जे घडले ते
व्यर्थ कधी हळहळली नाही
हृदयामधली करुणा जपण्या
डोळ्यांतुन घळघळली नाही
संयम इतुका तनामनावर
वादळात उन्मळली नाही
काजळीचे नेत्रांजन केले
अंतर्यामी मळली नाही
खळाळणारा झरा “सुनेत्रा”
आग विझवली जळली नाही