पुत्रा तुझ्या विना पण आहे कसा जिता मी
भरल्या घरात सुद्धा असतो रिता रिता मी
देहात घाम मुरवत मी वावरात राबे
गगनात मेघमाला मन भाव तपविता मी
उलटून साठ सत्तर गेलीत कैक वर्षे
होऊन ज्येष्ठ ज्येष्ठी आयुष्य अर्पिता मी
हो जलद कृष्ण काळा ये बरसण्यास मजवर
सुकल्या तृणाप्रमाणे आसावला पिता मी
नव्हतो कधीच शायर त्यांच्यासमान मोठा
खरडून चार ओळी होतो स्वरांकिता मी
गाती तरन्नुमातच माझ्याच गझलला ते
विश्वास श्वास माझा रचतो न भाकिता मी
लिहिल्यात कैक तरही उसळून शब्द निर्झर
मक्त्यातली सुनेत्रा कर्ता न करविता मी