घे लिंबलोण उतरुन आली वरात दारी घोड्यावरून उमद्या
तृष्णा वधूत शिरली येता घरात स्वारी घोड्यावरून उमद्या
वाटावया जनांना शमण्या क्षुधा युगांची बुंदी कळ्या करंज्या
पात्रे अनेक भरुनी गाजे परात भारी घोड्यावरून उमद्या
फुललाय सोनचाफा वारा सुगंध वाही कामास शांत करण्या
चंपक गुलाब बकुळी तोले करात नारी घोड्यावरून उमद्या
डोंगर निळा दिगंबर भासे मुनी तपोघन आभाळ पेलणारा
प्रासुक झरा जलाचा ओते भरात झारी घोड्यावरून उमद्या
गागालगा लगागा ऐश्या लगावलीने होताच पूर्ण मात्रा
न्याहाळते सुखाला मम चांदरात न्यारी घोड्यावरून उमद्या
इरसाल लेखणीने दैवास मीच माझ्या घडवीत जाय पुढती
सांडेल संपदा ‘जिन’ जल निर्झरात सारी घोड्यावरून उमद्या
भरला घडा “सुनेत्रा” बरसे तनामनाने मक्त्यातल्या ऋचांनी
अक्षररुपी खगांची किलबिल स्वरात वारी घोड्यावरून उमद्या