नवरी मोजे नऊ दिवस
नवे नव्याचे नऊ दिवस
घट मातीचा धान गहू
उगवे वाढे नऊ दिवस
चैत्रामधल्या नवरात्री
वसंत नाचे नऊ दिवस
मेंदी हळदी चुडा मणी
झेल टोमणे नऊ दिवस
कर्मकरंट्यांना बडगा
नव्व्याणवचे नऊ दिवस
हाव दागिन्यांना चाटे
सोसत फटके नऊ दिवस
कौटुंबिक हिंसाचारी
मूळ पोसले नऊ दिवस
सैल जिभांना आवळता
पुरते जिरले नऊ दिवस
लाभदायी मम घाईपण
जडत्व जडगे नऊ दिवस
शुभात माझे मन रमता
गर्जत झरले नऊ दिवस
बुमरँग न हे उलटाया
सुनेत्रातले नऊ दिवस