खळाळणारा बघत रसमयी धवल सांडवा भाळू कशाला
तरल धुक्याच्या मलमलीतून रंग पारवा गाळू कशाला
परवडणारी चैन सुगंधी दरवळणारी फुले वेलीवर
शुभ्र कुंतली अत्तर दर्दी मूक ताटवा माळू कशाला
जीव लावण्या जीवावरती कुत्रे मांजर पक्षी पारवे
श्रावण बीवन पौष आषाढ पर्व भादवा पाळू कशाला
पहाटवारा पहाट चुंबन टोक गाठता जाणीव नेणिव
तोच तोच तो गूळ फोडुनी अती गोडवा चाळू कशाला
वजने मापे न्याय करोनी अश्रुपिंड दो सुकुन कोरडे
अश्रूंनी तोलण्या भावना सक्त ताजवा टाळू कशाला
मम यंत्री मन सहज बसविते र्हस्व दीर्घला पलटून बघते
सत्त्व लीलया गळी उतरता उपवासाने वाळू कशाला
हवा गुलाबी ऊब जांभळी मिळवाया शेकोटी तांबडी
अंधरुढींच्या आगीमध्ये निळा गारवा झाळू कशाला
रंगबिरंगी कागद शाई गझल काव्य घन रंगून जाई
सुशांत समयी नयन खोदुनी जून आसवा ढाळू कशाला
निर्वाणीची नकोच भाषा जड दुःखाचे मूळ गाठूनी
मक्त्यामधले वदन सुनेत्रा देत लाडवा जाळू कशाला