कुणाकडे ती पाहुन हसली वदला उत्सव
जाता जाता वाटेवरती अडला उत्सव
मी असताना हवा कशाला गुलाब हिजला?
खोटे खोटे बागेवरती रुसला उत्सव
वसंतातही मोहरलेल्या फांदीवरुनी
शिशिरामधल्या पानांसम टपटपला उत्सव
चिवचिवते अन उगाच फिरते घरट्याभवती
त्या चिमणीच्या बाळापरि किलबिलला उत्सव
कळ्या फुलांना कोण सांगतो नटावयाला
चिडवुन त्यांची फिरकी घेता खुलला उत्सव
लेकुरवाळी वेल हासरी डोलत आहे
चैतन्याचा साज लेवुनी सजला उत्सव
हवेच घरटे सागरतीरी मला ‘सुनेत्रा’
म्हणता म्हणता आठवणींचा हसला उत्सव