रंगली मेंदीत भिजुनी गार हिरवी गझल सृष्टी
बिल्वरी सोन्यात झळके ताम्र तांबुस धवल सृष्टी
लेखणीने मी खणे ती अक्षरांची खाण आहे
हरघडी लयलूट करण्या वर्णमाला नवल सृष्टी
वाट वळणाची जरी ही पावलांना साथ देते
जिनस्तुतीमय काव्य तिरुवल्लूवरांची कुरल सृष्टी
गच्च आभाळी कडाडत वीज भेदे जलद भारी
कोसळे पाऊस धो धो प्राशुनी जल सजल सृष्टी
नीर चांदी जणु झळाळे कुमुदिनी किरणांत न्हाती
चांदणे कैवल्य शशधर धन प्रवाही विमल सृष्टी
जे हवे ते सहज घडते पाहता बिंबात करतल
दाटते नेत्रांवरी जे दूर करते पटल सृष्टी
देव दानव नरक जन्नत भूवरी या जाणुनी धर
मानवा तुज तातडीने बदल म्हणते बदल सृष्टी
काय शिकवी धर्म तुजला अंतरीचा तेच कर तू
घे खुशीने जे मिळे ते सरळतेने कमल सृष्टी
भ्रमर कामातूर कैदी कमलिनीच्या प्रीत पंखी
सूर्यकिरणे मुक्त करती घ्यावयाला फसल सृष्टी
संस्कृतीचे दिवस भरता प्रकृतीला जन्म देण्या
वाळवंटी संगमरवर गोलघुमटी मुघल सृष्टी
ना पटे लज्जेस सक्ती जाम फेसाळून सांडे
घे करी तो लाव ओठी मम सुनेत्रा तरल सृष्टी