खरे ते मरुन जन्माला पुन्हा येता ..झरे येथे
खरे ते सत्य रेखावे जरी पाडे .. चरे येथे
कधी भूकंप कोरोना निसर्गाच्या वळण वाटा
खरे ते धर उमेदीने वसायाला घरे येथे
फुलांचे दूत वारे ! वादळे अन कीड भुंगे ना ..
खरे ते ! खोल गाभारे सुगंधाने भरे येथे …
नको बाजार गप्पा वेळकाढू हृदय सोलूया
खरे ते गोड फणसाचे चला खाऊ गरे येथे
सुनेत्रा गझल लिहिते कलम तासूनी प्रमाणे पण ..
खरे ते बोलता लिहिता कसाई का ठरे येथे …