बहिणी खरेच सच्च्या भावांस जागणाऱ्या
लावून अर्थ हितकर नावांस जागणाऱ्या
जेथे न फक्त चर्चा चारित्र्य पूजिती त्या
ओढाळ अंतरीच्या गावांस जागणाऱ्या
मांडून चूल दगडी मी भाकऱ्यांस थापे
घन तापल्या तव्यांच्या तावांस जागणाऱ्या
जे घाव तू दिले मज भरुनी तयांत सौरभ
फुलती कळ्या सुगंधी घावांस जागणाऱ्या
जिंकावयास हृदये उधळू सयी सुनेत्रा
मागून घेतलेल्या डावांस जागणाऱ्या