हे झाड सांगते काय मला `..
कथा सांगते जणु मजला..
गुजगोष्ट सांगते मला…
पानांच्या ओठातुन हसते..हळुवार सळसळते
सांगते..,
” या दगडी भिंतींचा भक्कम शेजार मला!
प्रभातीस हे ऊन कोवळे ..भाद्रपदातील ..
खेळते बागडते माझ्या देहावरती ..या दगडी भिंतींवरती..
इथल्या भूमीच्या कणकणावर …मुक्तपणे…!
हवा वाहते शीतल झुळझुळ …
परिमल भिजल्या पानफुलांचा…ओल्या खोडांच्या सालीचा ..
अन मातीचा आत दाटला…भरून घेतो मी श्वासातून…
पानांच्या रंध्रांतून…!
या पाऊस धारा झरती रिमझिम ..टपटप..झिमझिम झिमझिम !!
कधी बरसुनी धुंवाधार घन वेगे …
स्नान घालती तनामनाला …!
पुलकित होते तनमन अवघे …हृदय मोकळे होऊन पुन्हा
आनंदाने भरून घेते सुगंध ओला !!”
हे झाड सांगते गुज मला !