कशास जाशिल तिथे अता तू विस्कटलेली पिसे बघाया
लपवुन काळे धवल परांनी खोटे खोटे उगी रडाया
डोळ्यांमधले खारे पाणी असते अपुल्या रडगाण्याचे
भरून ठेवा मिठागरातुन अळणी भोजन बरे कराया
प्रीती म्हणजे नव्हे मोगरा गुलाब तो तर काट्यामधला
गाली नाही नेत्री फुलतो हृदय घेउनी येच पहाया
तुझी आसवे इतुकी निर्मल वाहुन नेती मीपण अवघे
शिंपल्यात ती पडतिल का रे होऊन मोती मज उजळाया
पुरुष नव्हे मी प्रकृती आहे स्वाभाविक ते मला आवडे
नार्सीससचा वसा सोडुनी येशिलका तू इथे रहाया
क्षणात धरती क्षणात अंबर पिसे लागले तुला कुणाचे
उतरून तुझिया डोळ्यामध्ये कसे लागले पहा वहाया