अनवट कोडे मृदुल उकलले उकलीमध्ये अजून काहीं अनवट अनवट
नाताळातिल शेकोटीची धूसर चाहुल दिशांत दाही अनवट अनवट
वक्र स्वभावी सरळ जाहले बिळात शिरण्या बीळच फुटले जळी चिंबले
त्यांस तपविण्या शिशिरामधले ऊन हिवाळी त्राही त्राही अनवट अनवट
शुद्धात्म्याला फक्त पूजिती गुणानुरागी नाव असूदे काहीपण मग
देह दिगंबर जिनवर ब्रम्हा आदम येशू ईश इलाही अनवट अनवट
विहिरीतिल जल उकळुन गाळुन जिनमूर्तीच्या प्रक्षाळास्तव अर्क औषधी
वस्त्रामधल्या उरल्यासुरल्या गाळामध्ये द्रव्ये साही अनवट अनवट
मुनी दिगंबर येता दारी पडघावुन आहार द्यावया लगबग घाई
कुणी लपेटून काया घेई सोवळ्यात तन सोज्वळ शाही अनवट अनवट
कुंकुम मिश्रित हळद माखली नूतन पात्रे विसळुन घेण्या नीरा वाहे
गडद निळाई कृष्ण तनूवर दंडांवर मलमलची बाही अनवट अनवट
शुद्ध भावमन साक्षी आत्मा कर्मनिर्जरा संवर हेची कर्तव्यासह
घडे “सुनेत्रा” वयानुसारी बाकी अंतर्दृष्टी पाही अनवट अनवट