झालर काळी – ZALAR KALI


पापणीस तव झालर काळी थरथरणारी अतीव सुंदर
नकोस मिटवू उघड पाकळ्या कमलदलांसम सजीव सुंदर

कधी वाटते खूप रडावे कारण त्याचे नकळे मजला
अश्रु-विमोचन करता फुलते अंतरातली उणीव सुंदर

मन घाबरते वादळ येता मेघ सावळे मनी दाटता
कोसळतो मग तांडव करुनी हवाहवासा वळीव सुंदर

शीळ घालतो अवखळ वारा श्यामल शीतल मेघ नाचरे
बरसुन विणती अवनीवरती मोर हासरे भरीव सुंदर

व्यर्थच  गेले जीवन सारे मनास भुंगा कधी पोखरे
आणि अचानक मनकोशातुन शिल्प प्रकटते घडीव सुंदर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.