जोमानं तारू किनाऱ्या लावू
भावांची भूमिका चित्रात ओतू
घामाच्या मोत्यांनी देहाला सजवू
स्वच्छ जलाने अंघोळ करू
शुभातून नंतर शुद्धात राहू
संवर निर्जरा लक्षात ठेवू
नेकीने टिकू युक्तीने विकू
कर्तव्यपालन स्वधर्म पाळू
धरून धर्मास संसार मांडू
प्राणाचे हित साधत जगू
स्वतःच्या जीवाला स्वतःच जपू
दशधर्म शिडी बांधून घेऊ
गुणांशी मैत्री संयम राखू
सत्यास जागत काव्यात रंगू
जहाज होडी गलबत नाव
यानात अंबर झुंबर फिरवू
बर्फात इग्लू मंदिर घडवू
जिन मूर्ती तयात स्वयंभू पाहू
समवशरणात खिरेल वाणी
आईच्या भाषेत शास्त्रार्थ जाणू
समवशरणी वेळेत पोचू
आकड्यांच्या क्रमात बद्ध ना होऊ
मोक्षाच्या मार्गाला सहज करू
आर्जव मार्दव शुचितेत न्हाऊ
सुनेत्रा आत्म्याला शरण जाऊ