दिलजमाई – DIL JAMAI


धर्म अर्थातिल कमाई घागरीने ओत ज्येष्ठा
बहरण्या ग्रंथी तराई घागरीने ओत ज्येष्ठा

सागरी भुवनी वनी जलधार घुसळत मुसळ नाचे
तैलचित्रातिल सवाई घागरीने ओत ज्येष्ठा

कुमुदिनी निशिगंध चाफा मोगरा बकुळी सुगंधी
व्हावयाला दिलजमाई घागरीने ओत ज्येष्ठा

जलद भरता मोतियांनी मुक्तकांची माळ झरण्या
मुक्तछंदातिल रुबाई घागरीने ओत ज्येष्ठा

दाटता घन अक्षरांना तोलणारी मर्मग्राही
जोहरी मी ना कसाई घागरीने ओत ज्येष्ठा

वाचले अनुयोग काही फक्त नाही चाळले ते
वेड ना हे मम भलाई घागरीने ओत ज्येष्ठा

धाक खाकी शायरीचा रंग चढवे पाप जळण्या
लाल काळी पीत शाई घागरीने ओत ज्येष्ठा

लोळुनी मातीत ज्यावर नीज येते मज सुखाची
चिंब भिजण्या चारपाई घागरीने ओत ज्येष्ठा

वेळ ना जाते कधीही येत असते जागवीण्या
शब्दशिल्पावर निळाई घागरीने ओत ज्येष्ठा

धावदोरा टीप उलटी हेम तिरपी शिवण हस्ती
शिकविण्या धंदा शिलाई घागरीने ओत ज्येष्ठा

भय कशाचे गावयाला मेघमल्हारा सुनेत्रा
संपता वैशाख घाई घागरीने ओत ज्येष्ठा

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.