वाऱ्याच्या वेगे आभाळी घन वर्षाया येती
डोंगर माथ्यावर विश्रांती जमून येण्या घेती
पश्चिम क्षितिजी केशरकांडी कृष्ण ढगांतुन फिरता
संधीकाली सूर्यास्ताची घटिका उधळे रेती
अधिकामधला वाण पाऊस फोडुन वादळ येता
कडाडणाऱ्या जलद मेघना विजेस टाळी देती
मुसळधार जलधारा शीतल थेम्ब टपोरे मोती
संशय शंका धो धो धुवुनी शुभ भाव फळे देती
रत्नत्रयमय ज्ञान संपदा पुरुषार्थाची जादू
स्वतः स्वतःवर विजय मिळवुनी होय ‘सुनेत्रा’ जेती