काय राहिले सांग प्रियतमा लिहावयाचे बाकी
किती राहिले पत्थर अजुनी भिजावयाचे बाकी
दगडावरती साठत गेली बांधावरची माती
बोल केवढे अंकुर आता रुजावयाचे बाकी
कैक भरवल्या खतावण्या तू लिहून भाकड गोष्टी
पात्र कोणते कथांतल्या त्या रडावयाचे बाकी
चंचलपण तव नकोस मिरवू उघड चंचले चंचू
उकरुन माती टाक पुरून जे पुरावयाचे बाकी
पोपटपंची नको नाटकी पूस ‘सुनेत्रा’ मौना
नीर कुणाच्या पोटामधले हलावयाचे बाकी
मात्रावृत्त (८+८+८+४=२८मात्रा)