रंगले जरी कधी रंग ना मी उधळले
फक्त प्रेम ठेवुनी शेष काही विसरले
तुझ्याच आठवात मी दंगले पुन्हा पुन्हा
तुलाच शोधले पुन्हा जरी कधी हरवले
फुलापरी हसत मी चालले तुझ्यासवे
घसरता चुकून पाय हात फक्त पकडले
पुरेच खेळ हा सख्या कोसळू अता पुरे
म्हणत म्हणत मी तुला हळूहळूच बरसले
नाव मी तुझे खरे जपून ठेवले असे
जपत जपत नाव गाव पुन्हा पुन्हा बहरले