हित मित प्रिय अन सत्य गुरूची वचने टिपते मी
दशधर्माची महती कळण्या कवने रचते मी
ऊद धूप कर्पूर जाळुनी लावुन दीप दहा
प्रकाश आणिक परिमल यांनी भवने भरते मी
पूर्वभवांच्या उकलुन गाठी धागा सरळ मिळे
असले धागे धुते सुकविते वसने विणते मी
ध्यानाग्नीने राख व्हावया निजगत कर्मांची
जिनाबिंबा अंतरी स्थापुनी नयने मिटते मी
काव्यफुलांची ओंजळ करण्या रिक्त प्रभू चरणी
भावलतेवर पूर्ण उमलली सुमने खुडते मी