आरतीला सूर्य तारे चंद्र नक्षत्रे उभी
अंतरी जिन स्थापिला मी जैन भावंडे उभी
सागरी दुर्गावरी ध्वज पंचरंगी फडफडे
रंग देखाव्यात भरण्या मृत्तिका चित्रे उभी
पंचगंगा वारणा कृष्णा कऱ्हा गोदावरी
काफिया स्वर गझल नैया फेकुनी जाळे उभी
अंतराळातील व्यंतर देव आले दर्शना
मार्ग त्यांचा शुद्ध करण्या हळदुली पत्रे उभी
ओतता तबकात राशी शुद्ध भावे ओंजळी
उघडली दाही कपाटे स्वागता दारे उभी
घन लपेटूनी धुक्याला झोपली भूमी इथे
कुंचल्यातील भाव झरती शांतता आहे उभी
माय आणिक बाप माझे धन्य स्वर्गी उभयता
लेक त्यांची मी “सुनेत्रा” ताठ मानेने उभी