देहाचं तारू – my body’s ship


माझ्या देहाचं तारू
देहाचं तारू मी सोडलंय ग
माझ्या मनाचं वारू मी सोडलंय ग

दर्याला भरती आलीया बाई आलीया
तनामनाचं गलबत म्या सोडलंया
बाई सोडलंया
माझ्या मनाच्या शिडात
जिनभक्तीचं वारं भरलया
बाई भरलया
माझ्या देहाचं तारू मी सोडलंय ग …

माझ्या गळ्यात गाणं दाटलंय ग
माझ्या तळ्यात पाणी झरतंय ग
उरात अक्षर भांडार भांडार
भरलाय ग बाई
भरलंय
ओतून राशी शब्दांच्या
गुंफते जयमाला स्तुतीच्या
स्तुतीच्या बाई जिन स्तुतीच्या ..
माझ्या देहाचं तारू मी सोडलंय ग …

दर्यामंदी खडक पापांचे बाई पापांचे
धुवाया पापांच्या पंकाला बाई पंकाला
उसळून भक्ती येतीया बाई येतीया
पुण्याच्या राशी उधळत उधळत ..
माझ्या देहाचं तारू मी सोडलंय ग

जिनदेवाच्या चरणांना प्रक्षाल करावया
पल्याड जायाला तरून जायाला
मोहाचा अंधार जाळाया भक्तीची वात उजळून
बाई उजळून माझ्या देहाचं तारू मी सोडलंय ग

देहाच्या राऊळी देऊळी
माझ्या देहाच्या हृदय मंदिरी
लावून ज्ञानाचा दिवा मी
भक्तीच्या पुरात सोडलंय ग
माझ्या देहाचं तारू मी सोडलंय ग

आलं आलं ग बाई आलं ग
तारू तटाला अल्लद आलं ग
जिनदेवाचं मंदिर आलं ग
चाल लावून आरती गाऊया
अर्घ्य चरणी वाहूया
जिनदेवाचं दर्शन घेऊया
माझ्या भक्तीचं तारू मी सोडलंय ग
माझ्या देहाचं तारू मी सोडलंय ग ….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.