आत्मघाती संस्कृतीचा कळस खोटा जाण तू
सुंदरांच्या प्रकृतीचा पाय सोटा जाण तू
संधिसाधू बेरकी ते अक्षरांना बदलती
मस्त त्यांना ठोक द्याया काव्य गोटा जाण तू
मंदिरे ते बांधताती फायदा लाटावया
संत बनुनी कमवणे हा पुण्य तोटा जाण तू
मोडण्या लग्ने तयांचा कुंडलीचा फार्स हा
गूण मग जुळवीत बसण्या मोज नोटा जाण तू
हाच मोठा मीच मोठी वाद मी नच घालते
मोक्ष मिळण्या मम जिवाला मार्ग छोटा जाण तू
नीर प्याया पात्र गझला तव ‘सुनेत्रा’ बरसती
दुध निरसे प्यावयाला स्वच्छ लोटा जाण तू
वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ला गा.