पेटले जरी उभी थंडगार शीत तू
पांघरून बर्फ का जाळतेस प्रीत तू
रागरंग पाहुनी बोलतेस नेमके
जाणवून खोट ही पाळतेस रीत तू
अर्थ पूर्ण जाणला गूढता पुरे सई
लावलीस ओढ बघ प्रथम ओळखीत तू
तार छेडल्या विना वाजते सतार ही
तार तोडुनी अता ठरव हार जीत तू
काळजास काढुनी ठेविता कुणी रणी
सामना करू कसा हो लगेच चीत तू
वृत्त – गा ल गा, ल गा ल गा, गा ल गा, ल गा ल गा.