हे केले मी ते केले मी मिरवायाचे कशास मी पण
स्वभाव अपुला धर्म अहिंसा म्हणू कशाला दुजास मी पण
लक्ष्यावरती लक्ष ठेवण्या सावध असणे आळस नाही
आत्मधर्म लावण्या पणाला लावणार मी धसास मी पण
खेळ न करते मी शब्दांचा अंकुर जपण्या शब्द पेरते
फोडण्यास निःकाचित कर्मे कधी न घेते उशास मी पण
व्यवहाराला चोख ठेवण्या निश्चय माझा सदैव जागा
नेणिवेतल्या स्मृतींस ध्यानी सहज पाहता खलास मी पण
टोक गाठण्या टोकदार व्हावेच लागते हरेक टोकी
मम खांद्यावर माझी बंदूक चाहूल सांगे कुणास मी पण