झुकझुक गाडी मजेत धावे इंजिन घाली शीळ
वळणावरती झुळझुळ वाऱ्या तुझी अंतरी शीळ
सळसळणाऱ्या चाफ्यावर भुंग्यांचा भिंगत फेर
कीड फुंकण्या पाकळ्यातली आली ओठी शीळ
सुगंध ओल्या मृदेत भरण्या बकुळ फुलांचा सडा
शिंपित जाई झुळूक शीतल घुमते कानी शीळ
लाल गुलाबी धवल जांभळी सुमने फुलली छान
रानपाखरू झुलत घालते फांदीवरती शीळ
ऊन हिवाळी घाम काढते दुपार मौनी मीत
वर्तमान काळात लहरण्या आठवणींची शीळ