कुठे जायचे ते मला वाट सांगे कितीदा वळावे निळा घाट सांगे
फुले जांभळी वेचण्या वात शीतल कळीची खळी चुंबण्या लाट सांगे
तरल आवडी सावळ्या तव कळाल्या सुखाने तुला जेवण्या ताट सांगे
गुणांशी करायास व्यापार पक्का सदाचार माळू हळू धाट सांगे
जरी पायवाटा उन्हाने जळाल्या बरसण्या सरळ जळ वळ चऱ्हाट सांगे
पहाटे भिजूनी तळी चिंब पाने कथा दहिवराची धुके दाट सांगे
जपायास जीवा भरुन मृत्तिकेचा कलश ठेवण्या चंदनी पाट सांगे