मादक ओठांवरची मदिरा प्राशायाला हवी
झिंग तयातिल चालीमध्ये मुरवायाला हवी
स्पर्शाने मम उसळुन येता तव इच्छांचे नीर
दो हातांनी लाट रुपेरी अडवायाला हवी
मधुर गुपित चिरतारुण्याचे कळण्या मजला खरे
तव नजरेतिल तडका मिरची चाखायाला हवी
मिटशिल जेंव्हा नेत्रदलांना श्यामल तनूवरचे..
साठवुनी दव त्यातच मेंदी भिजवायाला हवी
कुणास वाटे चोरी मारी असली तरही गझल..
कल्पकतेची म्हणे उधारी चुकवायाला हवी
कैक सुनेत्रा गझला चाळुन चळल्या वळल्यावरी
तू लिहिलेली गझल समीक्षा वाचायाला हवी