भूमीताई सांग कसे मी होऊ तव उतराई
तुझ्या क्षमेची दिगंत कीर्ती गाते दुहिता माई
निर्झर बाळे अवखळ पेलत अंगाखांद्यावरी
शुद्ध नीर साठवण्या ह्रदयी खळगे ठाई ठाई
तलाव विहिरी धरण सरोवर समुद्र सागर ओढे
तव कायेवर आश्रय घेती तू तर त्यांची आई
सातपुडा सह्याद्री मांगी विंध्य हिमालय तुंगी
सम्मेद शिखर कैलास गिरिची तू माता बाई
नंदनवन तू मुक्त फुलविशी आर्जव धर्म तुझा
मार्दव धर्मी वेल गुणांची कुसुमांकित जाई
पृथ्वी धात्रीच्या पोटातिल कीड लीलया जळण्या
उसळे लाव्हारस अग्नीसम धगधग खंदक खाई
शुचिता अन सत्यार्थ फुलांचा सौरभ संयम धर्मी
तपोलीन वन मुनीमनासम झाली सुरभित राई
त्याग अहंकाराचा सहजी अकिंचन्य राधाऊ
ब्रह्मचर्य कळसा राऊळी मम घट बाळीकाई
जिना जिनालय जिनायतन घन आतुरले भेटाया
शीतल वारा पुढे सरकतो आलिंगन दे साई
दशलक्षणमय वृक्ष जिवांचे प्रतिकात्मक जिनमंदिर
मोक्षफळाचा इच्छुक आत्मा झरे जिनस्तुती शाई
देरासरचा देव दिगंबर अर्धोन्मीलित दृष्टी
सावकाश जा घे जिन दर्शन कशास लगबग घाई