नयन मनोहर कारंजे तुषार सिंचन उदक पडे
किती खोदशिल खोल दरी किती दिवस हा खेळ गडे
चंदन मात्रा उगाळुनी बाराखडी ग गझलेची
जिनेश्वरावर स्तवन स्फुरे छत्र धराया नाग फडे
जमीन आणिक शेर गुणी सहज जुळावे पंचांगी
रत्नत्रय हृदयात वसो जाणण्यास व्यापार धडे
निसर्ग गाथा गात रहा जिनायतन मन साथीला
अभिषेकास्तव प्रतिमेच्या भाव जलाचे पूर्ण घडे
कर्मनिर्जरेसह संवर सहज व्हावया जीवांचा
लक्ष्य भेदण्या आत्म्याच्या पर्वावर मम प्रीत जडे
हृदय तबक हातात धरू अष्टद्रव्य अर्चना करू
भक्तिरसाच्या कलशातुन चिंब भिजवुया सह्य कडे
तत्त्वार्थातिल सूत्र सात मोक्ष तयाचे नाम असे
“सुनेत्रा”तल्या अश्रूंनी कृतज्ञतेचे शिम्प सडे