चंपक चाफा हिरवा पिवळा दरवळ नाही लपत गडे
चंचल चपला ढगात शिरुनी कुपीस फोडे छपत गडे
डंका दंडकारण्याचा त्रिलोकात दुमदुमे सई
गज़ल सयी मम उभ्या ठाकल्या थेट बघत वर तपत गडे
चपळ चपल हरिणीसम धावत जलद निघाले वर्षाया
निळ्या सपाता गळून पडल्या पावलांस घन जपत गडे
वेग झपाटा झपाटलेला लगबग घाई सळसळती
ऊन सावली संगे वारा ताल धरतसे झपत गडे
वहाण चप्पल बूट खडावा नीटनेटक्या बाहेरी
अनवाणी पद गाभारी दो चिंब चिंब टपटपत गडे